श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी

मुंबई : २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले २२ तारखेला दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण सरकारने देशाचं जे दिवाळं काढलं आहे, त्याच्याविषयी खुलेआम चर्चा करावी, अशी मागणीही ठाकरेंनी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

 श्रीराम प्राण प्रतिष्ठापण सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न

“वर्षानुवर्षे प्रभू श्री राम मंदिरासाठी चाललेल्या लढ्याला अंतिमत: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. श्री राम प्राण प्रतिष्ठापण सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण द्यावं आणि प्राण प्रतिष्ठापणा त्यांच्या हस्ते व्हावी. केंद्र सरकार राष्ट्रपतींना आमंत्रण देईल का माहिती नाही. पण, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


राममंदिरात रामचंद्रांची मूर्ती असेल ना ?

शिवडी न्हावा शेवा सागरी मार्गाला अटल सेतू नाव दिलं, पण तिथे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटोच नव्हता. त्यामुळे मला चिंता आहे, राम मंदिरातही रामचंद्रांची मूर्ती असेल ना? एवढी कृपा करा तिथे स्वतःची नव्हे प्रभू रामचंद्रांची मूर्ती लावावी, 

काळाराम मंदिरात रामाचे दर्शन

येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहोत. तसेच गोदावरी काठावर आरती करणार आहोत. 23 तारखेला कार्यकर्त्यांचे अधिवेशन आणि संध्याकाळी जाहीर सभा असणार आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *