मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहममंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मत मिळत नाहीत, असे म्हणत या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडच्या दौऱ्यावर असून त्यांची नांदेडच्या अर्धापूर येथे सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून भाजपवर निशाणा साधला.
“भाजपला आता कळलंय की महाराष्ट्रात मतं पाहिजे असतील तर, मोदी या नावाने मत मिळत नाहीत तर ठाकरे या नावावरच मतं मिळतात. यासाठीच बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला. पण काहीच फरक पडत नाही. आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. घेऊन जा. मी आणि माझी जनता समोरासमोर येतो. ही लोक माझ्यासोबत उभी आहेत. यासाठीच मी सगळ्यांना विनंती करतो की, नुसतं जल्लोषात राहु नका. १०० टक्के आपण जिंकणार आणि जिंकणारच. पण जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले नाही तर जिंकू शकणार नाही” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
“भाजपला सत्तेचा हव्यास किती असावा. म्हणजे सत्तेतून सत्ता पुन्हा सत्तेतून सत्ता. पण आता नुसती सत्ता नाही तर, त्या सत्तेचा दुरुपयोग करून पैसा. त्या पैशातून पुन्हा सत्ता. म्हणजेच जाऊ तिथे खाऊ. मिळेल तिथे खाऊ, अशी भारतीय जनता पक्षाची निती आहे”, अशीही टीका ठाकरेंनी भाजपवर केली.