मुंबई : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी गेल्या अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे. सरकारने पेन्शन लागू करावं, वेतनश्रेणीत अंगणवाडी सेविकांना समाविष्ठ करावा अशी अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.
शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज अंगणवाडी सेविकांची भेट घेत पाठींबा दिला. ठाकरे म्हणाले, आज तुमचा भाऊ म्हणून आंदोलनात आल्याचे सांगत ठाकरेंनी भाषणाला सुरूवात केली. ईथे कोणतीही जाहिरात बाजी करायला आलो नाही. भाजपला मत देणे न देणे हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी लाडली बहिना योजनेची घोषणा केली. महाराष्ट्रात बहिणांना हक्कासाठी झगडावे लागत आहे. रस्त्यांवर बसण्याची वेळ आली आहे. या काही लाडली बहिणी नाहीत का, असा केंद्र सरकारला सवाल करत टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीचे सरकार पाडले, अन्यथा आंदोलनाची वेळच येऊ दिली नसती. मात्र, सरकारने अंगणवाडी सेविकांच्या केसाला धक्का लावला तर याद राखावा, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.