मुंबई :  ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी  उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याची साद घातली. त्याला प्रकाश आंबेडकरांनीही होकार दर्शविला आहे.  “शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ”, असं प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रमानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची नवी युती होणार असून, उध्दव ठाकरे प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

मागील काही दिवसांपासून आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच आज  ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर असल्याने या चर्चांना अधिकच जोर मिळाला होता.  उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली. “प्रकाशजी आता आपण एकत्र आलो आहोत, ते काम आपल्याला करावाच लागेल. आतापर्यंत बाबासाहेब आणि  बाळासाहेब यांचे फोटोंना अभिवादन करायचे. आता दोन नातू एकत्र आले आहे. कुटूंब एकत्र आले आहेत. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. परंतु, जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी साद घातली आहे.


 उध्दव ठाकरे म्हणाले की,  प्रबोधनकार यांच्या विचारांच्या मुशीतून आम्ही तयार झालो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आज मात्र त्याला कौटुंबिक रुप आले आहे. आज दोन नातू एकत्र आले आहेत’.

देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेनी होत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे, त्यासाठी जे-जे लोक एकत्र येऊ शकतील त्यांनी सोबत यायला हवं. राज्य हे केंद्राचे गुलाम नाहीत, हे राज्यघटनेत आहे. राज्य आणि केंद्राचं नातं कसं हवं? वाट्टेल ते करून आम्हाला सत्ता हवी अशी मनोवृत्ती केंद्राची झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर काय  म्हणाले   

“प्रबोधनकारांनी मनुस्मृतीला दोष दिलं. हे असं विष आहे की माणसाला कळत नाही की आपण विष पितोय. ते प्यायला नंतर बळी त्या माणसाचा जातो, पण त्याचबरोबर देशाचाही जातो. जेवढ्या लवकरात लवकर आपण या विष पाषाणातून बाहेर पडू तेवढं अधिकाअधिक लवकर आपण या देशाला उभं करु शकतो अशी परिस्थिती आहे, असं अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 “हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर आपण नेहमी वर्णन करतो की हा गुलामीचा इतिहास. मी असं मानतो की, गुलामी एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यामध्ये भरडले गेले.  राजेशाही क्षत्रियांची होती. यात केवळ शिवाजी महाराज अपवाद होते,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “सध्या धार्मिक दडपशाहीचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. पण आपल्या राज्यातील संतांची परंपरा याला अपवाद आहे. त्यांनी सुरू केलेली वारी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. वारीत जाणारा माणूस हा त्या दडपशाहीचा बळी ठरणार नाही,” असं आंबेडकर म्हणाले.

“दडपशाहीचं वातावरण वाढलेलं आहे. आपण मुसलमानांना म्हणतो की त्यांच्यात लोकशाही नाही. पण वैदिक धर्मात कुठे लोकशाही आहे? तिथेही हुकूमशाही आहे. ही व्यवस्था आहे, ती तुम्ही मानलीच पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, चिकित्सा करता येणार नाही. म्हणून आता नव्याने जे येत चाललं आहे, हुकूमशाही आणि हिटलरशाही ही त्या त्या संघटनेतील विचारधारा आहे. त्यातून ही विचारसरणी आपल्यापुढे आलीय.” प्रत्येकाने ठरवावे लागेल की तुम्हाला हुकूमशाही हवी की लोकशाही, असा सवाल आंबेडकरांनी विचारला. ते म्हणाले, प्रत्येक मतदाराने हा विचार करावा की ते लोकशाहीच्या बाजूने आहोत की हुकूमशाहीच्या बाजूने हा विचार करावा. प्रत्येक व्यक्तीने प्रबोधनकारांचे साहित्य वाचावे असे आवाहन आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!