रत्नागिरी : शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बारसु रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन. आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.
उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सोलगाव-बारसू रिफायनरीविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुम्ही काळजी करु नका. कोकणात लोकांचे मुडदे पाडून मी विकास होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जा. जे वादग्रस्त प्रकल्प नाहीत ते गुजरातला आणि बाकीचे इकडे. राख आम्हला आणि रांगोळी तुम्हाला हे चालणार नाही. जनतेचे हाल करुन विकास होत असेल तर तसा विकास मी होऊ देणार नाही, अशा शब्दात उद्धाव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींवर निशाणा
मी तुमच्या सोबत आलोय. मन की बात करायला मी इथे आलेलो नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी शिवसेना चोरायचं काम केलं. आपण निवडणूक आल्यावर त्यांना बघू. मी जसं उभा राहिलो तसं बाकीच्यांनी उभं राहावं. इथं दुर्घटना होता कामा नये. शिवसेना तुमच्या सोबत आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेवर टीका
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, समृद्धी महामार्गावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन आम्ही मार्ग काढला होता. समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन जिल्हेही मंत्री म्हणून ओळखत नव्हते. आज ३३ देशांत गद्दार म्हणून त्यांची ओळख आहे. समृद्धी महामार्गाच्यावेळी मी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात गेलो होतो. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा दाखवल्या. या शेतांमधील झाडं फळांनी लगडलेली होती. तेव्हा शेतकऱ्यांशी बोलून आम्ही समृद्धी महामार्गाचा रस्ता पलीकडून नेला आणि त्यांच्या फळबागा वाचवल्या. अशाप्रकारे लोकांशी बोलून मार्ग काढावा लागतो. सरकारला रिफायनरी आणायची असेल, पण स्थानिक लोकांचा विरोध असेल तर येथे रिफायनरी येता कामा नये. मी राज्य सरकारला आव्हान देतो की, त्यांनी माझ्याप्रमाणे लोकांसमोर उभे राहून बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करुन दाखवावे. चांगल्या प्रकल्पांना विरोध करायला कोकणी माणूस मुर्ख नाही. पण राखरांगोळी करणारे विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारले जात असतील तर तो प्रयत्न खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.