मुंबई : मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. ठाकरे म्हणाले, ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. मोदी सरकार हे गॅसवर आहे. ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला.
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तसेच शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.
ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, आमची विचारधारा वेगवेगळी आहे पण आमचा उद्देश एकच आहे. ब्रिटिश विकास करतच होते पण त्यापेक्षा जास्त आम्हाला स्वातंत्र्य हवं होतं. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे ठाकरे म्हणाले.
भाजप आणि एनडीएवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमच्याकडे पंतप्रधानांच्या चेहऱ्यासाठी अनेक पर्याय आहेत, परंतु एनडीएकडे पंतप्रधानपदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. कर्नाटकमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले. त्यांना बजरंग बलीला आणावं लागलं. पण देवानेही त्यांना आशीर्वाद दिला नाही. असे ते म्हणाले. ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कायकाळाची तुलना ब्रिटिश राजवटीशी केली. “इंग्रजांनीही विकासाची कामे केली, पण जर आपण त्यांना पूर्ण ताकदीने विरोध केला नसता तर आपल्याला आज स्वातंत्र्य मिळाले नसते. आम्हाला विकास हवा आहे, पण स्वातंत्र्यही हवे आहे.
रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. महिलांना आपल्या देशात सुरक्षित वाटलं पाहिजे असं शासन पाहिजे. दुर्देवाने असं शासन आता आपल्या राज्यात दिसत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घ्या. मी असं म्हटलं होतं की बिल्कीस बानोकडून राखी बांधून घ्या. मणिपूरच्या महिला, महिला कुस्तीपटू यांना दुर्लक्ष केलं गेलं. देशावर प्रेम करणारे सगळे लोक एकत्र आले आहेत. आम्ही हुकुमशाही विरोधात आहोत. गॅस सिलेंडरचे दर कमी झाले. आगामी काळात आमच्या बैठकीनंतर हळूहळू सिलेंडर फ्रीमध्ये देतील. कारण ते सरकारही गॅसवर आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्याचं सरकार काय करत आहे, पंतप्रधान काय करत आहेत असेही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा?
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, बरोबर, उद्या जातो, शपथ घेतो, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचा संयोजक कुणाला ठरविण्यात येणार ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन दिवसांनी बैठक पूर्ण झाल्यावर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.