मुंबई: दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, रामाने रावणाचा वध केला कारण, रावण माजला होता. त्याने सीताहरण केलं होतं. त्याचप्रमाणे, आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. रामाने रावणाचा वध धनुष्यबाणाने केला होता म्हणून त्यांनी धनुष्यबाणही चोरला. पण ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची लंका जाळली, तशी हजारो धगधगत्या मशालींनी तुमची खोक्यांची लंका जाळून टाकू अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदेवर टीकास्त्र सोडले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र आणि देशात सध्या खूप प्रश्न आहेत. भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देत आहे. अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं आहे. आज त्यांनी धनगरांना साद घातली.” ज्याप्रमाणे डायरने जालियनवाला बागमध्ये गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अंतरवाली सराटीमध्ये लाठीहल्ला केला. एवढ्या निर्घृणपणे कसे वागता. मी मुख्यमंत्री असतानाही आंदोलन सुरू होतं. तेव्हा मी लाठीचार्जचा आदेश दिला नव्हता. तेच पोलीस आहेत, पोलीस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत.
आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. तो धनुष्यबाणही यांनी चोरला आहे. ज्या प्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका पेटवली होती. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी इथं शिवसैनिक जमला आहे असे ठाकरे म्हणाले. आमदार अपात्र तेच्या मुद्द्यावरून ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष करीत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपसांत झुंजवण्याचं जे कारस्थान भाजप करत आहे, ते आपल्याला मोडून टाकायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढत आहोत तो कपटी आणि विघ्नसंतोषी आहे. भाजप एवढा विघ्नसंतोषी आहे, जे कोणाचंही लग्न असो तिथं जाणार, पोटभरून खाणार, ढेकर देणार पण निघताना नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात भांडण लावायला जाणार अशा शब्दात ठाकरेंनी भाजपला लक्ष केल. भाजप किंवा जनसंघाचा कोणत्याही लढ्यात कधी सहभाग नव्हता. भाजप ज्या ज्या पक्षांबरोबर जातात त्यांच्यात भांडण लावतात. त्यामुळं जरांगे पाटलांना सांगतो की, त्याच्यापासून सावध राहा असेही ठाकरे म्हणाले.