मुंबई : आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांची फौज उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरश: तुटून पडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना तुम्हाला फडणवीसांचं राजकारण संपवायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे म्हटले. तर भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, भाजप नेते केशव उपाध्ये ठाकरेंवर तुटून पडले.
——-