मुंबई : महाराष्ट्राच्या भुकंपावर शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदा सौख्य भरे.. अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करीत काही प्रश्न विचारले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटाला काही प्रश्न विचारले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न.

पहिला प्रश्न, ‘मंत्रिमंडळ विस्तार झाला, आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?’

दुसरा प्रश्न, ‘रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?’

तिसरा प्रश्न, ‘एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?

चौथा प्रश्न, सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि एनसी सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना…

शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’ अशी ही लढाई असणार आहे !’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *