मुंबई, दि. ६ः उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादावर शिंदे गटातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. जमीनीच्या वादाला राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मंत्रालयात पार पत्रकार परिषदेत सामंत यांनी शिवसेना ठाकर पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरेंच्या कोकण दौ-यावर टीका केली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे सामंत म्हणाले.
रत्नागिरीतील जाहीर सभेत ठाकरे यांनी सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. २०१४ ला पक्षात घेऊन थेट मंत्री पदे बहाल केली. आता गद्दारांच्या पेकाटात लाथ घालणार, अशा शब्दात ठाकरेंनी बंडखोरांना सुनावले होते. यावर सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. सामंत म्हणाले की, म्हाडाचे अध्यक्ष पद असो किंवा मंत्री पद असो. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच मिळाला, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. मला मिळालेल्या मंत्री पदाचा कोणीही श्रेय घेऊ नये, अशा शब्दात सामंत यांनी ठाकरेंना ठणकावले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोकण यावेळी ठाकरेंना थारा देणार नाही, असे सामंत म्हणाले. तसेच येत्या निवडणुकीत महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. सिंधुदुर्ग, रत्नागिरीपासून रायगड पर्यंतची सगळी मंडळी लवकरच शिंदेच्या सेनेत असतील, असेही ते म्हणाले.
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आणि मंत्रालय परिसरात गुंडांकडून केलेल्या चित्रीकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. सामंत यांनी मात्र सरकारची बाजू लावून धरत सावध भूमिका मांडली. दोषींवर कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ठाकरेंच्या वंदे भारत रेल्वे प्रवासावरून ही त्यांनी टीकेची झोड उठवली.