एमएफसी पोलिसांची कामगिरी
कल्याण : कल्याण पश्चिमेतील शहाड परिसरातून दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे चार जणांनी मिळून अपहरण करून त्याला म्हारळ जवळच्या टेकडीवर नेले होते. तेथे चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण करून अपहृत विद्यार्थ्याकडील 16 हजारांची रोकड हजार रूपये लुटण्यात आले होते. या दोन्ही अपहरणकर्त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड करण्यात यश मिळविले आहे.
विनायक मदने आणि बबलू जडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोघांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नीरज भोलानाथ यादव (20, रा. चिखलोली, अंबरनाथ) या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून विनायक मदने, विजय आणि आर्यन अशा तिघांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मंगळवारी पहाटे 2.40 च्या सुमारास शहाड जकात नाक्या नाक्यावर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या नीरज यादव याला तिघा अनोळखी इसमांनी दुचाकीवर बसवून कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावाजवळील टेकडीवर नेले. तेथे लाथा-बुक्क्यांनी झोडपून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमक देऊन त्याच्याकडील डेबिट, क्रेडिट कार्डसह रोख रक्कम काढून घेतली.
अपहरणकर्त्यांनी जवळच असलेल्या एटीएममधून नीरज समोरच त्याच्या बँक खात्यातील 16 हजारांची रक्कम काढली. तेव्हापासून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पित्रे आणि त्यांचे सहकारी फरार अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. अखेर शोध मोहिमेचा यश आले. अपहरणकर्त्यांपैकी अन्य एकाचा पोलिस शोध घेत आहेत.