मुंबई : लँडिंगनंतर व्हीलचेअर नाकारल्याबद्दल संतप्त झालेल्या दोन महिला प्रवाशांनी विस्तारा एअरलाइनवर प्रत्येकी १० कोटी रुपयांचा स्वतंत्र खटला दाखल केला आहे. मोनिका गुप्ता (वय ४९) आणि त्यांची आई उषा गुप्ता या दोघींनी १४ सप्टेंबर रोजी कोलंबो ते मुंबई असा बिझनेस क्लासने प्रवास केला त्यावेळी हा प्रकार घडला.
मोनिकाचा भाऊ मुधित गुप्ता याने मुंबईच्या ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे नुकसान भरपाईची मागणी करणारी दोन प्रकरणे दाखल केली होती. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडेही तक्रार दाखल केली होती असे नासलेगल कायद्याचे कौटुंबिक वकील निष्ठा मलिक यांनी सांगितले.
मुधित गुप्ता यांनी सांगितले की, कुटुंबातील सात सदस्य त्यांच्या आईचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी श्रीलंकेला सुट्टीवर गेले होते आणि राऊंड ट्रिप बिझनेस क्लास बुकींग दरम्यान, मोनिका आणि उषा गुप्ता या दोघींच्या मदतीसाठी व्हीलचेअरची विनंती केली होती. मात्र कोलंबो विमानतळावर आई आणि बहिणीसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून न दिल्याने त्यांची सुट्टी कठीण ठरली. मोनिका तीव्र संधिवात आणि न्यूरोपॅथिक डिसऑर्डरने त्रस्त आहे तर उषा एम. गुप्ता, ज्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. हा प्रकार विस्ताराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोलंबोमधील एअरलाइनच्या हेडने माफी मागितली आहे.
विशेष बाब म्हणजे, UK-132 हे उड्डाण मुंबईत संध्याकाळी साडेसहा वाजता टोलँडवर नियोजित होते, मात्र त्या दिवशी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक छोटे चार्टर्ड बिझनेस विमान कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेमुळे ते हैदराबादला वळवण्यात आले आणि सर्व उड्डाण काही काळ थांबवण्यात आली होती.
गुप्ता म्हणाले की, अल्पोपाहार किंवा जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना जवळपास आठ तासांचा त्रास सहन करावा लागला. मोनिकाची बिघडलेली तब्येत आणि लँडिंगनंतर पुन्हा व्हीलचेअर नसताना विस्ताराचे केबीन क्रु पुरेसे वैद्यकीय मदत देण्यात अयशस्वी ठरले.
मोनिकाने वेदनाशामक औषधे घेतली होती आणि वेदना कमी करणारे स्प्रे देखील लावले होते, परंतु विमानात दाब आणि बराच वेळ बसून राहिल्याने त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. केबीन क्रु ने ना तिला टॉयलेटमध्ये जाण्यास मदत केली नाही कि डॉक्टरला बोलावले, त्यांनी तिला फक्त काही अपरिचित मलम आणि वेदना कमी करणारे बाम दिले,
उषा एम. गुप्ताही तितक्याच दमल्या होत्या आणि मोनिकाप्रमाणेच त्यांना लवकर घरी पोहोचायचे होते, परंतु केबिन क्रूने दोन आजारी महिलांची प्रकृती बिघडलेली असतानाही त्यांना विमानातून उतरण्यास प्राथमिकता दिले नाही कि समन्वय साधला नाही.
“केबिन क्रूने वैद्यकीय कारणास्तव आमचा प्राधान्याचा दर्जा सोडण्यासाठी आमच्यावर दबाव आणला आणि आम्हाला योग्य सहाय्याशिवाय एका निसरड्या रॅम्पवर चालण्यास भाग पाडीत आम्हाला अपमानित केले. आम्हाला कोणतीही वैद्यकीय मदत किंवा वाहतुकीचे पर्याय नव्हते आणि आम्ही एक तास अंधारात अडकून पडलो असेही गुप्ता म्हणाले. रात्री 11.45 च्या सुमारास व्हीलचेअर आली असली तरी खूप उशीर झाला आणि अपुरा असल्याचे कुटूंबाने सांगितले. प्रवासी कोच येण्यापूर्वी कुटुंबाला अर्धा तास स्वत:ची काळजी घ्यावी लागली आणि त्यांना इमारतीत घेऊन जावे लागले.