मानपाडा पोलिसांची कामगिरी
डोंबिवली : खोणी गावात सुरू असलेल्या म्हाडा प्रोजेक्टमधील इमारतींत घुसून तेथील इलेक्ट्रिक केबल वायर्स चोरून पसार झालेल्या दोघा चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या चोरट्यांकडून कारसह 10 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंदू अप्पा शिंदे (28, रा. नकुल हाईटस्, वारजे गांव, ता. हवेली, जि. पुणे) आणि भास्कर रवी महाडीक (29, रा. सुतारदरा, कोथरूड ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण कोर्टाने या दोघांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
९ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान अज्ञात इसमांनी खोणी गावात सुरू असलेल्या म्हाडा प्रोजेक्टमधील बांधकाम पूर्ण झालेल्या १३ इमारतींच्या सर्व मजल्यांवरील इलेक्ट्रीक डकचे लॉक तोडून वायरींगकरिता वापरलेले पीव्हीसी पाईप जाळण्यात आले. तब्बल १५ लाख ३२ हजार १६० रूपये किंमतीची पॉलीकॅब कंपनीची आर्थिंग केबल चोरी केल्याची तक्रार म्हाडा प्रोजेक्टचे एचआर असिस्टंट राकेश राजेंद्र वाघ यांनी 18 डिसेंबर रोजी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
वपोनि अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश मदने, पोनि. राम चोपडे पोनि. दत्तात्रय गुंड, सपोनि अविनाश वनवे, सपोनि संपत फडोळ, सपोनि प्रशांत आंधळे, हवा. सुनिल पवार, हवा. राजेंद्र खिलारे, हवा. दिपक गडगे, हवा. निसार पिंजारी, पोना रविंद्र हासे, पोना शांताराम कसबे, पोशि महेंद्र मंझा, पोशि अशोक अहेर या पथकाने चोरट्यांचा माग काढला. तांत्रिक पद्धतीने तपास केला असता ही चोरी तिघांनी मिळून केल्याचे समोर आले.
त्याअनुषंगाने पुण्यातील खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींचा वावर पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचे समजले. पोलिसांचे पथक तात्काळ पुण्याडे रवाना झाले. पथकाने साध्या वेशात वारजे आणि कोथरूड पोलीसांच्या मदतीने 2 ठिकाणी सापळे लावून चंदू शिंदे आणि भास्कर महाडिक या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी म्हाडा प्रोजेक्टमध्ये केबल चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून आत्तापर्यंत 6 लाख 64 हजार रूपये किंमतीच्या आर्थिंग केबलसह गुन्ह्यात वापरलेली 4 लाख रूपये किंमतीची मारूती स्विफ्ट कार असा एकूण 10 लाख 64 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील अन्य एकजण हाती लागला नसून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.
*****