डोंबिवली : स्वरकोकिळा लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधूताई सकपाळ, प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी, प्रसिद्ध कलाकार ऋषी कपूर, इरफान खान आणि सुशांतसिंग राजपूत यांना आपल्या बहारदार नृत्यातून स्वमग्न मुलांनी श्रद्धांजली वाहिली. डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथला असलेल्या आदर्श विद्यालयाच्या सभागृहात संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेज चिर्ल्डनमधील या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी पार पडले. संमेलनात विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांनीही नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेज चिर्ल्डन डोंबिवलीत येथे 38 स्वमग्न विद्यार्थी शिकत आहेत. करोनाच्या दोन वर्षांच्या काळात या मुलांनी एकत्र येऊन मज्जामस्तीचा आनंद लुटला नव्हता. राज्य सरकारने करोनामुक्त राज्य जाहीर केल्याने पुन्हा नव्याने स्वमग्न मुलांनी स्नेहसंमेलनच्या निमित्ताने सुंदर नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवली भोईर जिमखान्याचे मुकुंद भोईर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक महेश दवंडे, ज्येष्ठ पत्रकार बजरंग वाळुंज, आनंद डिचोलकर, संस्थेचे विश्वस्त दत्ताराम फोंडे, मुख्याध्यापिका कांचन पवार, संस्थेचे संतोष बागणे, वंदना रावराणे, आदि मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थांनी सादर केलेले नृत्य पाहून उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी संस्थेचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी शिक्षकवर्ग महिनाभर मेहनत घेत असतात.