ठाणे, अविनाश उबाळे : आपल्या जीवाची तमा न बाळगता तलावातील खोल पाण्यातील चिखलात उतरून तासनं तास एक एक कमळाची फुल खुडून टोपलीत गोळा करुन ती शहरात आणून नवरात्रौत्सवात विकायची, आणि त्या मिळणा-या पैशातून वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी शहापूर तालुक्यातील आदिवासी महिला दरवर्षी नवरात्रौत्सवात कमळाची फुले विकण्याचा व्यवसाय करतात.
नवरात्रौत्सवात देवीच्या चरणी वाहण्यासाठी मोठ्या श्रध्देने नऊ दिवस भाविकांकडुन कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी असते ही कमळाची फुले खास शहापूरात विक्री करण्यासाठी आदिवासी महिला दाखल झाल्या आहेत. शहरातील अंबिका माता मंदिरा बाहेर आदिवासी महिला कमळांची फुले विकतांना आता नजरेस पडत आहेत. १० रुपयाला एक कमळाचे फुल अशा दराने आदिवासी महिला या फुलांची विक्री करुन नवरात्रौत्सव काळातील नऊ दिवस रोजगार मिळवित आहेत.
शहापूर तालुक्यातील लहान तलाव व ओव्हळाच्या काठवरील चिखलात ही कमळाची फुले उगवतात ही फुले पाण्यात उतरुन मोठ्या मेहनतीने ही फुले खुडुन टोपलीत भरुन शहापूर शहरात आदिवासी महिला विक्रीसाठी आणतात. ही कमळाची फुले मिळवण्यासाठी पहाटेच तलावावर जावे लागते. तलावाच्या काठावरील चिखल तुडवित पाण्यात उतरून तासनं तास कमळ फुलांचा शोध घेऊन मोठ्या मेहनतीने आदिवासी महिला पुरुष फुले वेचून टोपलीत भरतात. कमळांच्या फुलांना नवरात्रौत्सवात जास्त प्रमाणात मागणी असल्याने ही फुल खरेदी करतांना ग्राहक आता नजरेस पडत आहेत.
कमळ फुलां बरोबर झेंडुची खुरासनीची पिवळी फुले देखील आदिवासी महिलांनी विक्रीसाठी सध्या आणली आहेत खास नवरात्रौत्सवात ग्राहकांकडून या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे दिवसभरात या फुलांच्या विक्रीतून ३०० ते ४०० रुपयांची कमाई होते असे या व्यवसायातील कमळ निरगुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले .