*वृक्षलागवडीसाठी महाराष्ट्र सज्ज !*

*उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवडीचा विश्वास*

*वनमंत्र्यांनी दिल्या महावृक्षलागवड कार्यक्रमासाठी शुभेच्छा*

मुंबई ( अजय निक्ते ) : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला असून राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड होईल असा विश्वास सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला तर या महिनाभरात होणाऱ्या महावृक्षलागवडीसाठी सर्वांना शुभेच्छा देतांना वनमंत्र्यांनी वृक्षलागवडीत अधिकाधिक लोकसहभाग मिळवा, वृक्षलागवडीचे अभियान यशस्वी करा असे सांगतांना वृक्षलागवड कार्यक्रमात पारदर्शकता जपण्याचे आवाहन केले.

आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी,महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी व्हिडिओकॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला आणि राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीचा अंतिम आढावा घेतला यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह वन आणि नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व अधिकाऱ्यांनी वृक्षलागवड कार्यक्रमाची सुनियोजित दैनंदिनी तयार करावी, १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात येत असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमाचे  स्थळ, वेळ आणि लोकसहभागाची सुनिश्चितता करावी अशा सूचना देऊन वनमंत्री म्हणाले की, वृक्षलागवड मोहिमेत शंकेला स्थान राहू नये म्हणून केलेले सर्व काम वन‍ विभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडिओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जावे.  दर सहा महिन्यांनी या वृक्षारोपण स्थळांची, वाढलेल्या रोपांची, प्रजातींची माहिती या संकेतस्थळावर नव्याने भरण्यात यावी. अशा पद्धतीने पुढील दोन वर्षात चार वेळा ही माहिती अद्ययावत केली जावी. जेणेकरून वृक्षलागवडीची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला याबद्दलची सविस्तर माहिती अक्षांश रेखांशासह मिळू शकेल.

महात्मा गांधीजींनी १९३६ मध्ये सेवाग्राम येथे लावलेल्या पिंपळाच्या झाडापासून कलमं तयार करून ही रोपं ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात पुढच्यावर्षी राज्यातील २०६ शहीद स्मारकांमध्ये लावण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. त्यांनी काही जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक ही केले. औरंगाबाद विभागात ४३३ टेकड्यांवर वृक्षलागवड होत असून प्रत्येक टेकडीसाठी आयुक्तांनी एक टेकडी अधिकारी नेमला असल्याची बाब कौतूकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपळवन, बांबू वन, ऑक्सीजन पार्क, बेल वन, सीताफळ वन,आंबा वन, चिंच वन, नक्षत्र वन, वड-पिंपळ आणि कडुनिंबाचे त्रिमूर्ती वन अशी वने राज्यभरात विकसित केली जात आहेत.  काही ठिकाणी फळझाड रोड, फुलबाग रोड, शोभिवंत वृक्ष रोड अशा नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत, नदीकाठी वृक्षलागवड होत आहे. जलसंपदा प्रकल्पाच्या काठाने वृक्ष लागवडीचे नियोजन झाले आहे. कार्यालय तिथे श्रीफळ संकल्पना राबविली जात आहे, शालेय विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या वृक्षलागवडीसाठी विद्यार्थ्यांना ट्री प्रोग्रेस कार्ड देण्यात येत आहे. गोंदियात दुर्मिळ वृक्षप्रजातींची लागवड होत आहे. यवतमाळ मध्ये २५ एकरांवर ऑक्सीजन पार्क विकसित होत आहे. कुठे शुभेच्छा तर कुठे शुभमंगल वृक्ष लागत आहेत, कुठे गृहप्रवेश वृक्ष लागणार आहेत. कुठे तुतीची मोठ्याप्रमाणात लागवड होत आहे. या सर्व कल्पना स्वागतार्ह असून निश्चित कौतूकास्पद आहेत असेही ते म्हणाले.

*प्रत्येक शहराचा टी.पी प्लान तयार करा*

अधिकाऱ्यांनी मनामधलं “वन” जपावं, पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन हे अभियान यशस्वी करतांना शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड व्हावी अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.   प्रत्येक नगरपालिकेने, नगर परिषदेने आणि महानगर पालिकेने आपल्या शहराचा विकास आराखडा तयार करतांना वृक्ष आराखडा ही तयार करावा  अशा सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत १३ कोटी वृक्षलागवडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम १ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा कोकण विभागाच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकारी यांनी घ्यावा अशा सूचना देऊन सुधीर मुनगंटीवार यांनी ३ ऑगस्ट २०१८ रोजी पुन्हा होणाऱ्या व्हिडिओकॉन्फरंसिंगमध्ये १३ कोटी वृक्षलागवडीचा आढावा आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.

राज्यात आजघडीला  १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी १ लाख २९ हजार २३७ स्थळांची नोंदणी वन विभागाच्या संकेतस्थळावर झाली आहे. राज्यात २५ कोटी पेक्षा अधिक रोपं लागवडीसाठी उपलब्ध आहेत. १२ कोटी १० लाख खड्डे वृक्षलागवडीसाठी खोदून तयार आहेत.  वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्षलागवड करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोपं मिळेल  अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  ५२ लाखांहून अधिक लोकांची हरित सेना महाराष्ट्रात सज्ज झाली आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

वन सचिव विकास खारगे यांनी १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेतील काम पारदर्शीपणे लोकांसमोर ठेवा, केलेले काम वन विभागाकडे नोंदवा, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी सारख्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात भाविक येतात. त्याना प्रसाद म्हणून रोप देता  येईल का याची चाचपणी करा, रोहयोअंतर्गत २०० झाडांमागे एका कुटुंबाला झाडं जगवण्याचे काम देता येईल त्याचे नियोजन करा,जलयुक्त शिवार प्रमाणे वनयुक्त शिवार संकल्पना राबवा  अशा विविध सूचना यावेळी दिल्या.
__

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!