डोंबिवली, दि. १४ ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या बदल्या केल्या आहेत. हे कामगार दहा प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव आणि अतिक्रमण नियंत्रण विभागांत कार्यरत होते.
फेरीवाला हटाव आणि अतिक्रमण नियंत्रण विभागातील काही कामगार अनेक वर्षांपासून एकाच प्रभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या फेरीवाले व बेकायदा बांधकाम करणाऱ्या भूमाफियांशी साटेलोटे असल्याचे समोर आले होते. महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी अनेकदा फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले होते, परंतु कल्याण आणि डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटवले जात नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे फेरीवाला हटाव पथकातील कामगार आणि फेरीवाल्यांमधील साटेलोटे असल्याचे निदर्शनास आले.
तसेच, महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना पाठिंबा देण्यात अतिक्रमण नियंत्रण विभागातील काही कामगार सामील असल्याचीही चर्चा होती. बेकायदा बांधकामांवर कारवाई करत असताना या विभागातील कामगारांच्या हस्तक्षेपामुळे कार्यवाही अडखळत होती, अशी तक्रार अनेक तक्रारदारांनी केली होती.
पूर्वीही अशा प्रकारे फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामगारांच्या बदल्या झाल्या होत्या, परंतु कामगारांनी राजकीय आणि मंत्रालयातील नातेवाईकांच्या दबावामुळे बदल्या टाळल्या होत्या. त्यामुळे यावेळीही तसाच प्रकार घडणार नाही याची काळजी महापालिका आयुक्त डॉ. जाखड आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना घ्यावी लागणार आहे.