ठाणे : नेहमीच वाहनांच्या रांगा असलेल्या घोडबंदर रोडवर शुक्रवारी कंटेनर उलटल्याने वाहन चालकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. या अपघातामुळे ठाण्याहून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दररोजच्या वाहतूक केांडीत अधिकच भर पडल्याने वाहनचालक कमालीचे हैराण झाले होते. घोडबंदर रोडवर वाहतूक केांडी नित्याचीच झाली असून, या कोंडीतून ठाणेकरांची सुटका कधी होईल असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
घोडबंदर रोडच्या पातलीपाडा येथील पातलीपाडा उड्डाणपुलाच्या शेजारील मार्गिकेवर कंटेनर उलटला. कंटेनर चालक कर्वेद कुमार (४५) यांचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे पुलाशेजारील मार्गिकेवरून जाणारी वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस ठाण्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत बॅरिकेटिंग केले. तसेच घोडबंदरच्या दिशेने येणारी वाहतूक रोखून मार्गिकेवर उलटलेला कंटेनर हटवण्याची मोहीम हाती घेतली. अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालक कर्वेद याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घोडबंदर रोड येथील उड्डाणपुलांआधी कंटेनर उलटल्याच्या घटना वारंवार घडतात. याआधीही सात महिन्यांपूर्वी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणारा अवजड कंटेनर पातलीपाडा पुलाच्या चढणीवर पहाटे उलटला होता. या अपघातानंतर कंटेनरला आग लागली होती. आगीच्या भडक्यात चालकाचा अक्षरशः कोळसा झाला होता. याच पुलाशेजारील मार्गिकेवर गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी ऑईल टँकरही उलटला होता. तसेच वाघबीळ उड्डाणपुलाशेजारील मार्गिकेवर कापडाची वाहतूक करणारा ट्रक उलटला होता. या अपघातांमुळे घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदारांना बसतो. तसेच अपघातात वित्त आणि जीवितहानी होते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.