कंत्राटदार कंपनीची मनमामानी, शहापूर पोलीसांचे दुर्लक्ष
मुंबई, अविनाश उबाळे : मुंबई नाशिक महामार्गावरील महत्वाच्या चार ओव्हर ब्रीज बांधकामांची कामे सध्या कासव गतीने सुरू आहेत यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या उभी राहिली आहे.रोज वाहन चालकांना आणि प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई, नाशिक ,आग्रा या राष्ट्रीय महामार्गवर महामार्गा प्राधिकरण या विभागाकडून, महामार्गावरील वासिंद ,आसनगाव,या ठिकाणी ओव्हर ब्रिजची महत्त्वाची कामे सध्या महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहेत.मात्र ही पुलांची कामे करीत असताना महामार्गावरील वाहतुक सुरक्षितेचे आणि वाहतूक नियोजनाचे कोणतेच नियोजन कंत्राटदार कंपनीने व प्राधिकरणाने पाळलेले दिसत नाहीत.केवळ ब्रिज ची कामे करण्यासाठी कंत्राटदाराने महामार्गावरील मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे.
रस्त्याच्या कडेला डीवाईडर लावून महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे.ओव्हर ब्रिज ची कामे करण्याअगोदर कंत्राटदाराने वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे होते.परंतु तसे नकरता मुख्य रस्ताच पुलांच्या कामांसाठी ऐकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.यामुळे एकच मार्गीकेवर वाहनांच्या वाहतुकीचा ताण वाढत आहे.
यामुळे महामार्गावर एकाच वेळेस वाहनांची प्रचंड अशी कोंडी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत.महामार्गावरील ओव्हर ब्रिजच्या या कामांमुळे होणाऱ्या रोज वाहतूक कोंडीला वाहनचालकांना व प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावर ट्रक, ट्रेलर, कंटेनर, टेम्पो, कार ,अशी शेकडोच्या संख्येने वाहने रोज धावत असतात वाहतूक कोंडी झाल्यास मुंबईहून नाशिक कडे जाणारी तर नाशिकहून मुंबईकडे जाणारी अनेक वाहने यामध्ये अडकून पडतात त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.
यामुळे प्रवासी व वाहन चालकांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे.या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकून पडतात त्यामुळे रुग्णांचे तसेच प्रवाशांचे देखील हाल होतात.अशाच प्रकारे गेल्या शुक्रवारी दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत महामार्गावर तब्बल सहा तास वाहनांची वाहतूक कोंडी होऊन शहापूर, आसनगाव, वासिंद, दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता वाहनांच्या कोंडीने ब्लॉक झाला होता. यांत अनेक प्रवासी व वाहन चालक अडकून पडले होते.
रोज होणाऱ्या वाहतूक वाहतूक कोंडीस केवळ पुलांची कामे करणाऱ्या कंत्राटदार कंपनी याच जबाबदार असून कंपनीच्या बेपर्वाई व निष्काळजीपणामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक व प्रवाशांना करावा लागत आहे.
यामुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. महामार्गावर सुरू असलेल्या पुलांच्या या कामामुळे रोज वाहतूक कोंडी होत असल्याने ही कोंडी सोडवताना महामार्ग पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.ही वाहतूक कोंडी व वाहतूक सुरळीत करण्याकडे शहापूर पोलीस ठाण्याचे कमालीचे दुर्लक्ष दिसत येत आहे.
–
कंत्राटदार कंपनीची बेपर्वाई
वाहतुकीचे नियोजन न करणाऱ्या व वाहतुकीच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या व पुलांची कामे करताना महामार्ग प्राधिकरणाचे नियम काटेकोरपणे न पाळता नियम धाब्यावर बसवून कामचुकारपणाने वागणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.असे वाहन चालक व प्रवाशांचे म्हणणे आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर ओव्हर ब्रिजची कामे सुरू झाली तेव्हापासून महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी ओव्हर ब्रिज ची कामे वेळेत व लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. – राकेश डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस शहापूर