ठाण्यातील अनधिकृत धामिर्क स्थळांवर कारवाई करा :
महापालिका आयुक्तांचेआदेश
ठाणे : महापालिका क्षेत्रात ज्या परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत ती तात्काळ निष्कासीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आज महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी आज सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर अनधिकृत धार्मिक स्थळे तात्काळ निष्कासीत करावीत अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी दिला आहे.
पीजी पोर्टल, आपलं सरकार यावरील प्रकरणे १५ दिवसामध्ये निकाली न काढल्यास संबधीतावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षकांनी शहरात फिरून कोणत्या ठिकाणी कचरा टाकला जातो याचे सर्वेक्षण करून कचरा उचलण्याची कारवाई तात्काळ करावी, तसेच शहरातील सार्वजनिक शौचालये यांची दुरुस्ती व साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नागरिकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी व त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत तसेच महापालिकेच्या प्रत्येक कार्याशी स्वतःला भावनिकदृष्ट्या जोडून काम करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिका-यांना केले. यावेळी जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बॅनर, झेंडे पुढील ३ दिवसात काढून टाकणे, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून फेरीवाले व दिव्यांग व्यक्ती यांना स्टॉल्स उभारणीसाठी जागा निश्चित करणे अशा सूचना त्यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या.