ठाणे(३१): ठाणे महापालिका सहाययक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरील्याकडून जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आता पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे मंगळवारी नौपाडा-कोपरी तसेच कळवा प्रभाग समितीतंर्गत विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या व साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईतंर्गत नौपाडा – कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन, सॅटिस परिसर, जांभळी नाका, नौपाडा आणि गावदेवी मंदिर परिसर तसेच कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट व पारसिक ९० फूट रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान दिवा प्रभाग समितीमधील साईधाम अपार्टमेंट, मुंब्रा देवी कॉलनी येथील अनधिकृत इमारतीचे कॉलम बीम व स्लॅब तोडण्यात आला. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.