ठाणे, दि २० जूलै : सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील बारवर ठाणे महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीजबारवर सील केले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्था कायदा २००५ च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोविड-१९ आजाराचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायं ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायं ४ वा.नंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन केलेल्या १५ आस्थापना महापालिकेने आज सील केल्या.
या कारवाईतंर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीजबार सील करण्यात आले.