ठाणे, दि. ९ (प्रतिनिधी) : शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीसाठी केलेली घोषणा म्हणजे ठाणेकरांना विश्वासघाताची वचनपूर्ती'आहे,अशी खरमरीत टीका भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज येथे केली. संपूर्ण करमाफीऐवजी शिवसेनेने केवळ ३१ टक्के करमाफी देत ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली. यापुढे शिवसेनेचे आश्वासन म्हणजेबड्या घरचा पोकळ वासा’असेल, हे ठाणेकरांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही आमदार डावखरे यांनी लगावला आहे.

ठाणे महापालिकेच्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यावेळी मोठ्या अविर्भावात शिवसेनेच्या ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेने केलेल्या वचनपूर्तीची आठवण करून दिली होती. मात्र, आता मालमत्ता करातील सामान्य करामध्ये केवळ ३१ टक्के माफी देत शिवसेनेने फसवी मालमत्ता करमाफी दिली, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली.

ठाणे महापालिकेत २५ वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांचा विश्वासघात केला. संपूर्ण मालमत्ता करमाफीचे आश्वासन देऊन आता खोटारडेपणा करण्यात आला. तसेच ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली.

ठाणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, ७०० चौरस फुटांच्या घरांना अंशत करमाफी देण्याचे वचन दिले होते. इतर वेळी शिवसेनेचे नेते जबाबदारी घेण्याच्या गप्पा मारतात. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘माझा मास्क माझी जबाबदारी’, असे जनतेला आवाहन करतात. मग आता ‘माझे वचन, माझ्याकडूनच वचनपूर्ती’ असे कधी म्हणणार, असा सवालही आमदार डावखरे यांनी केला.

मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री शिवसेनेचेच, मग अडले कुठे?
मुख्यमंत्री व नगरविकास मंत्रीपद शिवसेनेकडेच आहे. मालमत्ता करमाफीचा विषय हा मंजुरीसाठी दोन्ही नेत्यांकडेच होता. अशा परिस्थितीत संपूर्ण मालमत्ता करमाफी करण्याचे धोरण मान्य करताना `अडले कुठे, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला. सतत २५ वर्षांपासून सत्ता देणाऱ्या मुंबई-ठाण्यातील सामान्यांना करमाफीचा दिलासा देताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने ठाम भूमिका का घेतली नाही, असा सवालही डावखरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!