ठाणे, (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील दुकाने रात्री साडेनऊपर्यंत खुली ठेवण्यासाठी पुढाकार घेणारे महापौर नरेश म्हस्के व बार-रेस्टॉरंटला रात्री साडेअकरापर्यंत वेळ देणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून महासभा वेबिनारवर घेण्याचा निर्णय का घेतला जात आहे. ठाण्यात निर्बंध शिथिल होत असताना प्रत्यक्ष महासभा का टाळली जात आहे, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून दुकाने व बार-रेस्टॉरंटवर निर्बंध लागू करण्यात आले होते. महापौर नरेश म्हस्के यांनी दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री साडेनऊपर्यंत करण्यासाठी पुढाकार घेतला होता, याबद्दल त्यांचे अभिनंदन. दुकानांच्या धर्तीवर महापौरांनी महापालिकेचा पारदर्शक कारभार व शहरातील विकासाच्या प्रश्नांची चर्चा होण्यासाठी वेबिनार महासभेऐवजी प्रत्यक्ष महासभा घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने बार-रेस्टॉरंटच्या वेळेत तातडीने वाढ केली. मात्र, आता प्रत्यक्ष महासभा का टाळली जात आहे, असाही सवाल नारायण पवार यांनी केला आहे. संसद व महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन पार पडले.
कोरोना’विषयी लागू केलेल्या नियमावलीनुसार व सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट करून अधिवेशनात सर्व कामकाज झाले. अधिवेशन बोलाविल्यामुळे १४ दिवसांपर्यंत सदस्य व कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असल्याचे आढळलेले नाही. मात्र, एकिकडे देश व राज्य स्तरावरील अधिवेशने होत असताना, ठाणे महापालिका अद्यापि वेबिनार महासभेवर ठाम आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. ठाणे महापालिकेची २० ऑक्टोबर रोजी वेबिनारद्वारे महासभा घेण्याचा निर्णय महापालिका सचिवांनी वर्तमानपत्राद्वारे जाहीर केला. यापूर्वीच्या वेबिनार महासभांप्रमाणेच या सभेतही कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर झालेला खर्च व अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यापूर्वीच्या महासभेत माझ्यासह काही सदस्यांचा आवाज `म्यूट’ केल्याचा प्रकार घडला होता. तर वेबिनार महासभेत प्रश्नोत्तराचे कामकाजही होत नाही. त्याचबरोबर महापालिका अधिकाऱ्यांकडून उत्तरेही मिळत नाहीत. या परिस्थितीत महापालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी प्रत्यक्ष महासभा होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेकडे राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उपलब्ध आहे, असे नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापालिका सचिव अशोक बुरपल्ले यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
*****