दिवा :-दिवा स्टेशन परिसरातील इमारतींवर ठाणे पालिकेकडून धडक कारवाई सुरू आहे, मात्र ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असल्याने दिवावासियांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे दिवाळी साजरी करता आली नाही, यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने दिवाळीचा उत्साह आहे. मात्र एकिकडे दिवाळीचा उत्साह नागरिकांमध्ये असतानाच दुसरीकडे पालिकेने दिव्यात रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली धडक कारवाई केली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही कारवाई केल्याने दिवावासियांमध्ये तीव्र नाराजीचा सूर पसरलाय.
दिव्यात शिवसेनेचे आठ नगरसेवक आहेत. पालिकेत त्यांची सत्ता असताना स्थानिक नेते माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिवाळी सणाच्या तोंडावर कारवाई थांबविण्याची विनंती प्रशासनाला करायला हवी होती. दिवाळीत रहिवाशांना बेघर करणे कितपत योग्य आहे. दिवाळीनंतरही कारवाई करता आली असती. दिवाळीनंतर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन घरे खाली केली असती मात्र ऐन दिवाळी नागरिकांना बेघर केले आहे याचे उत्तर सत्ताधा-यांना द्यावे लागेल असा सवाल भाजपचे नेते रोहिदास मुंडे यांनी केलाय.