मुंबई (प्रतिनीधी) : कारची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरीत अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.सोनू सिंग बाबरीया असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याचा साथीदार कुलदीप सिंग हा पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या चोरट्याने आपल्या मेव्हण्याच्या मदतीने वसई आणि जळगावमध्ये हत्या आणि दरोड्याचे गुन्हे केले होते. तेथून हे दोघे पसार होते. या दोघांनी टिटवाळा परिसरातून एक कार चोरली होती. गाडी चोरी केल्यानंतर रस्त्यात एका ठिकाणी भुर्जी खाण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे सोनू सिंग बाबरीया हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मात्र त्याचा साथीदार कुलदीप सिंग हा पसार झाला आहे.
टिटवाळा पोलिस ठाण्यात कार चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथकाने गाडी चोरी करणाऱ्याचा शोध सुरू केला. सीसीटिव्हीच्या माध्यमातून तपास करत असताना पोलिसांना चोरी गेलेल्या गाडीमधून दोघे जण भुर्जी खाण्यास उतरल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी तपास करून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. या गाडीची तब्बल 14 वेळा खरेदी-विक्री झाली होती. पोलिस 14 व्या मालकाच्या घरी पोहचले. या गाडीच्या मालकाचे नाव कुलदीप सिंग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कुलदीप सिंगचे घर गाठले. यावेळी घरात त्यांना सोनू सिंग आढळून आला.
कुलदीप आणि सोनू विरोधात वसई आणि जळगावमध्ये हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल असून ते तेथून फरार होते. अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.