टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्षातील अभिमानास्पद उपक्रम
डोंबिवली : डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सहा कार्यक्रमांच्या अमृतोत्सवातून जमा केलेल्या निधी संकलनातून डोंबिवलीच्या हम चँरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने जम्मू काश्मीर खोऱ्यातील भारतीय शिक्षा समितीच्या दशमेश नगर आणि उधमपूर येथील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४ च्या जुलै महिन्यात या दोन्ही विज्ञान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आणि जम्मू काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रयोगशाळांचा वापरही सुरू केला. या उपक्रमामूळे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जम्मू काश्मीर खोऱ्यात अमृतमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या आधी दोन्ही विज्ञान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या ही आमच्या मंडळासाठी अभिमानाची, आनंदाची आणि समाधानाची बाब आहे असे प्रकल्प प्रमुख संदीप वैद्य म्हणाले आणि जम्मू काश्मीर खोऱ्यातील दोन्ही प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी विशेष मेहनत घेतलेल्या हम चँरिटेबल ट्रस्टच्या मनोज नशिराबादकर आणि इतर कार्यकर्त्यांचे पण त्यांनी आभार मानले.
सहा सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिक डोंबिवलीकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद, वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून तृप्त झालेले आणि आता दरवर्षी अश्याच दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करा असा आग्रह धरणारे तसेच निधी संकलनालाही हातभार लावणारे रसिक डोंबिवलीकर आणि मंडळावरील प्रेमाखातर दर्जेदार कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे नामांकित कलाकार यांचे आभार मंडळाचे कार्यवाह संजय शेंबेकर यांनी मानले. तसेच सहा कार्यक्रमांच्या आयोजनातून दहा लाख रुपये उभे करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलून प्रत्येक्षात अकरा लाख वीस हजारांचा निधी संकलन करण्यासाठी मेहनत घेतलेले मंडळाचे आजी माजी कार्यकर्ते, मंडळाचे हितचिंतक देणगीदार आणि कंपनी CSR मधून मदत करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनांचे मंडळाचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी आभार मानले आहेत.