टिळकनगरच्या गणेशोत्सव मंडळाने साकारली, नागालँडची आदिवासी संस्कृती !
डोंबिवली (संदीप वैद्य यांसकडून) : गेली ६८ वर्षे सातत्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सालाबादप्रमाणे यंदाचा ६९वा श्री गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे. देश-विदेशातील विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिकृती साकारणारे प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी यावर्षी *नागालॅंडच्या आदिवासी संस्कृतीची प्रतिकृती’ साकारली आहे. यामध्ये नागालँड येथे असणाऱ्या मंदिरांची तसेच तेथील बांधकामातील वैविध्य दर्शविणाऱ्या काही गोष्टी साकारण्यात आल्या आहेत. अवघ्या तीन दिवसात साकारण्यात आलेल्या या देखाव्यामध्ये नागालँडमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकडाच्या वस्तू स्वत: संजय धबडे यांनी साकारल्या आहेत. यामध्ये नागालँडमधील आदिवासींच्या घरातून वापरण्यात येणाऱ्या वस्तू ज्यामध्ये सुपे, वेताच्या परड्या, टोपल्या तसेच शिकारीसाठी वापरण्यात येणारे लाकडी भाले, तीरकमठा इ. वस्तूंचा समावेश आहे. सजावटीच्या बरोबरच मंद आवाजातील व नागालँडच्या लोक संगीताने पण उत्कृष्ठ वातावरण निर्मिती झाली आहे आणि त्यामुळेच जमिनीवर खास अंथरलेल्या तरटांवर भाविकांना क्षणभर विसावण्याचा मोह आवरत नाहीये. नाँर्थ इस्ट मधील सेव्हन सिस्टर म्हणून ओळखल्या जाणारया सातही राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार दरबारी जे प्रयत्न सुरू आहेत त्यात खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने मंडळाने हि नागालँडच्या संस्कृतीचा सजावट संकल्पना साकारल्याचे मंडळाचे उत्सव समिती प्रमुख अमेय चिटणीस म्हणाले आणि आश्चर्य म्हणजे आलेल्या अनेक भाविकांना नागालँड भारतात आहे हेच माहित नाहिये त्यामुळे आमचा उद्देश काही अंशी सफल झाला असे वाटते असेही ते म्हणाले
प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करून पर्यावरणस्नेही सजावट साकारण्याची सुरूवात म्हणून मंडळाने गतवर्षी ‘श्री गणेशा हरित डोंबिवलीचा’ या आशयाने बगीचातील गणपतीचा देखावा साकारला होता. यंदाच्या वर्षीही त्याच दृष्टिने आणखी एक पाऊल पुढे टाकत थर्माकोलचा वापर संपुर्णपणे टाळून; लाकूड, कापड, चटया इ. पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करून यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदी आणि थर्माकोलच्या कमीत कमी वापराच्या आवाहनाला मंडळाने आपल्या कृतीतून प्रतिसाद दिला आहे असे मंडळाचे अध्यक्ष नंदन दातार म्हणाले
आज लोकमान्यांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे फार कमी उरली आहेत. त्यातीलच एक असलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पारंपारिक श्री गणेशोत्सवास सर्वांनी आवश्य भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण मंडळाचे कार्यवाह केदार पाध्ये यांनी केले आहे.
***