डोंबिवली : कल्याण-शिळ रस्त्यावरील क्लासिक हाॅटेलच्या मागील भागातील वाहनतळावरील एका वाहनातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पटेरी वाघाचे कातडे जप्त केले आहे. या प्रकरणी जळगाव, धुळे भागातील दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सिताराम रावण नेरपगार (५१, रा. तुळजा भवानी नगर, चोपडा, जळगाव) आणि ब्रिजलाल साईसिंंग पावरा (२२, रा. कोंडीबा, शिरपूर, धुळे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ४५ लाख रूपयांंहून अधिक रकमेचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना शिळफाटा रस्त्यावरील क्लासिक हाॅटेल परिसरात काही इसम पटेरी वाघाचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विनोद चन्ने, विलास कडू, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, वनपाल राजू शिंदे, वनरक्षक महादेव सावंत यांनी क्लासिक हाॅटेल मागील वाहन पार्किंगच्या भागात सापळा लावला. रविवारी दुपारी ठरल्या वेळेत एक स्विफ्ट डिझायर तेथील वाहनतळावर थांबली. त्यामधून दोन जण उतरून त्या भागात घुटमळू लागले. हवालदार भोसले यांंनी दोन जणांना याठिकाणी काय करता, असे हटकले. मात्र ते योग्य उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. हेच आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना घेरले. त्यांची अंगझडती आणि वाहनाची तपासणी केली असता त्यांच्याकडे पटेरी वाघाचे कातडे, पिस्तूल, जिवंत काडतुसे आढळून आली. वन्यजीव संरक्षण कायद्याने आरोपींंवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.