संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिद्धार्थ उद्यानातील बछड्याचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य हे नाव निघाले. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे नको म्हणत दुसरी चिठ्ठी काढून नाव दिले. दरम्यान वाघाच्या बछडयाच्या नामकरणावरून सत्ताधारी अणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्यामुळे या नामकरण सोहळयावरून  राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक बछडा दुर्दैवाने दगावला होता. मात्र, उर्वरित दोन बछडे हे सुखरुप असून त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून या बछड्यांचे नामकरण करण्यात आले. मात्र, या नामकरणापेक्षा योगायोगाने घडलेल्या एका वेगळ्याच प्रसंगाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिठ्ठ्यांनी भरलेली दोन काचेची पात्र ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातून पहिली चिठ्ठी उचलली. त्यामध्ये ‘श्रावणी’ असे नाव लिहले होते. त्यानुसार वाघाच्या मादीचं नामकरण ‘श्रावणी’ असे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी,’श्रावणात जन्माला आली म्हणून श्रावणी’, अशी शाब्दिक कोटीही केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातील चिठ्ठी उचलली. अजित पवारांनी उचललेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आले. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे नाव नको असे म्हणत दुसरी चिठ्ठी काढून नाव दिले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्यामुळे या नामकरण सोहळ्यावरून आता चांगलाच वाद रंगला आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, जंगलातील वाघांच्या बछड्यांचे नामकरण होत नाही. केवळ उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना नाव दिले जातात. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

वाघिणीच्या बछड्याचे नामकरण वरून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला टोला लगावला.. कधीही कोणताही आदित्य लपू शकत नाही,  तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवरदेखील एक आदित्य आहे. तिरस्कार करा मात्र आदित्य जास्त तळपत राहील.अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.

 शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय लागली आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा अशा प्रकारचा निर्णय या सरकारकडून घेतला जात आहे. आदित्य हे नाव ठेवले असते, तर चांगले झाले असते.आदित्य या नावाची सरकारला अॅलर्जी असल्याने नाव दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
—-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

अर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता. त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *