मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना नेाटीस पाठवून दोन महिन्यात माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच राहुल नार्वेकरांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावली होती. मात्र विधिमंडळ अधिवेशनचे कारण सांगून शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितल्याने प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. विधिमंडळ अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. त्यामुळे आता पुढील आठवडयापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होणार असून, दररोज एका आमदाराची सुनावणी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात प्रदीर्घ सुनावणी झाली. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय घ्यावा, यासाठी ठाकरे गटाकडून वारंवार विनंती केली जात होती. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दोन्ही बाजूच्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जात होतं. या दरम्यान ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी काय कारवाई केली, नेमकी काय माहिती मिळवली, याबाबत दोन आठवड्यात माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीवर उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांकडून राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर सादर करण्यात आलं होतं. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचं कारण सांगून शिंदे गटाच्या आमदारांनी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली होती. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
आता पुढील आठवडयापासून आमदारांच्या सुनावणी प्रक्रियेला वेग मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आपलं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केलं असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्यानुसार, राहुल नार्वेकर दररोज एका आमदाराचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. या दरम्यानच्या काळात शिंदे गटाकडून आपलं लेखी म्हणणं विधानसभा अध्यक्षांकडे मांडलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांची देखील प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाचे १४ असे ५४ आमदार आहेत. दररोज एका आमदारांची सुनावणी घेतली गेल्यास साधारण ५४ दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यातच शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस त्यामुळे दोन्ही गटातील आमदारांच्या सुनावणीसाठी देान ते अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावा लागणार आहे त्यामुळे या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहेत.