कल्याण : कल्याण पूर्वेतील वाढती नागरी वस्ती आणि त्या तुलनेत अत्यल्प पोलिस बळ, यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. याचा प्रत्यय कोळसेवाडी-गणेशवाडी परिसरातील दुकानदारांसह व्यापाऱ्यांना आला. बुधवारी एकाच रात्रीत या भागातील बारसह अनेक दुकानांचे शटर्स तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लांबविणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स फोडून चोरट्यांनी एक लाखाहून अधिकची रोकड लंपास केल्याने या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


बुधवारच्या मध्यरात्री 2 ते पहाटे 3 च्या सुमारास गणेश वाडीतील अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स, पाणेरी कपड्याचे दुकान, केअर अँड कॅअर, मेडीकल स्टोअर्स, या दुकानांसह देवी दयाळ टॉवर जवळ असलेले एक घरही फोडले. यात सर्वाधिक नुकसान सुभाष कदम यांच्या अन्नपूर्णा मालवणी दुकानाचे झाले. या दुकानातील रोख रक्कम, सोन्यासह 1 लाख 5 हजारांची चोरी झाल्याची तक्रार सुभाष विश्राम कदम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. सदर रक्कम दुकानातील कॅश काऊंटरमध्ये न ठेवता अन्य ठिकाणी ठेवली होती. ही रक्कम दुकानात आठवडातून एकदा येणाऱ्या होलसेल मालच्या सप्लायरला देण्यासाठी ठेवली होती, असे कदम यांनी सांगितले. रक्कम सुरक्षित रहावी म्हणून अन्य ठिकाणी ठेवूनही ती रक्कम चोरट्यांनी पळवून नेल्याने दुकान मालक कदम चिंताक्रांत झाले आहेत.

अमृत पॅलेस बार, मसाल्याचे दुकान, साडीचे दुकान आणि अन्य 3 दुकानांचे शटर्स तोडून चोरट्यांनी दुकानांतील रोख रक्कमांसह चीजवस्तू लांबविल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यातील चोरटा अमृत पॅलेस बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिस बळ वाढविण्याची मागणी

अन्य पोलिस ठाण्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस बळ कमी पडत आहे. या पोलिस ठाण्यांतर्गत दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस बळ वाढविण्यात यावे, विभागवार बंद असलेल्या पोलिस चौक्या चालू  कराव्यात. गस्ती वाढवाव्यात, अशी मागणी रहिवासी, दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *