कोळसेवाडी पोलिसांनी आवळल्या मुंब्र्याच्या डोंगरातून मुसक्या
कल्याण : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अजब पण तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आणली आहे. महागड्या कारमधून येणारे तीन जण दुकान फोडून त्यातील लाखोंचा माल पळवून फरार व्हायचे. मात्र एका दुकानामध्ये झालेल्या चोरीचा तपास करताना या गुन्हेगारांचे अन्यही गुन्हे उघडकीस आले आहेत. या त्रिकुटाच्या मुंब्र्यातून मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून तब्बल साडेसात लाखांचा चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान अशी या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांवर मुंबईपासून अनेक पोलिस ठाण्यांतून चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात असलेल्या चक्की नाका येथे बॅटरीचे दुकान फोडून या दुकानातून लाखो रुपयांच्या बॅटऱ्या लंपास करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे खास पथक चोरट्यांच्या मागावर सोडण्यात आले. या पथकाने ज्या दुकानात चोरी झाली तेथील व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
याच दरम्यान फौजदार रविराज मदने, पगारे, शिर्के, शांताराम सागळे, सुरेश जाधव, गावित, सांगळे, सोनवणे, हांडे, दळवी, भांबरे, कदम, घुगे, यांनीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला. मुंब्र्यातील डोंगर पट्ट्यात हे गुन्हेगार लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पथकाने त्या परिसरात सापळा लावून या तिन्ही चोरट्यांना गुन्हा उघडकीस आल्यापासून 24 तासांच्या आत अटक केली.
पोलिसांनी या तीनही आरोपींकडून 15 लाखांहून अधिक रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात मुंबईसह अनेक पोलिस ठाण्यांतून चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या त्रिकुटाने अशाप्रकारे आणखी किती ठिकाणी चोऱ्या केल्या असाव्यात याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.