डोंबिवली , दि,11 बॅटरीच्या दुकानाची रेकी करत रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून महागड्या बॅटऱ्या चोरणाऱ्या सराईत तिघांना बेड्या ठोकण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे . ही टोळी इन्व्हर्टर व गाड्यांच्या बॅटरीची चोरी करत होती.
नौशाद खान, मुजीब खान, आणि सलमान खान अशी या तीन चोरट्यांची नावे असून हे तिघे मुंब्रा कसा येथील राहणारे आहेत.
कल्याण पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष पथक तयार करत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला होता.
याच दरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे फौजदार रविराज मदने, पोलीस हवालदार शांताराम सागळे, सुरेश जाधव आदी पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला असता त्यांना मुंब्रा डोंगरी परिसरात हे गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर पोलिसांच्या या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत नौशाद, मुजीब आणि सलमान या तिन्ही आरोपींना २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. या तिघांकडून वाहनाची, इन्व्हर्टरची बॅटरी अशा अडीच लाख रुपये किमतीच्या बॅटरी व एक गाडी जप्त करण्यात आली आहे.
हे चोरटे वाहनांची व इन्व्हर्टरला लागणारा बॅटरी चोरी करायचे. यासाठी ते बॅटरीच्या दुकानांची रेकी करत व रात्रीच्या सुमारास संधी साधत या दुकानांमधील बॅटरी चोरी करायचे. या आरोपींवर या आधी देखील अशाच प्रकारे बॅटरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून ते सराईत चोरटे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.