डोंबिवली, दि,18 : मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे, असे सांगून डोंबिवलीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी विजय तांबे या भामट्याला नवी मुंबई खारघरहून अटक केली आहे. विजय तांबे याच्या विरोधात 50 हून जास्त फसवणूक करुन लुटीचे गुन्हे दाखल आहेत. असाध्य आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तो जामीनावर सुटतो आणि सुटून आल्यावर तो पुन्हा लोकांना बतावणी करुन लूटतो, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे.
डोंबिवलीतील महात्मा फुले रोड परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात विजय तांबे विरोधात तक्रार केली होती. मला रस्त्यात एक व्यक्ती भेटली. त्याने मला सांगितले की, मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी आमदारांसोबत भेटलो होतो. ते वयोवृध्द काका त्याच्या या बोलण्यानंतर आठवत होते की, ते त्याला नक्की कधी भेटले. इतक्यात त्याने आजोबांकडील दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. आजोबा बँकेतून नुकतेच पैसे काढून बाहेर पडले होते. त्याच वेळी ही घटना घडली.ज्या ठिकाणी आजोबांना बतावणी करुन लुटले गेले, तेथीस सीसीटीव्ही विष्णूनगर पोलिसांच्या हाती लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्या घरी छापा टाकला. तो घरी सापडला नाही. ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा हा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अखेर त्याचा शोध सुरू असताना पोलिसांनी काही दिवसात त्याला खारघर येथून अटक केली. अटक होण्याआधी त्याने दोन वयोवृद्धांना ही लूटले होते. विजय तांबे याने अटक झाल्यानंतर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.