डोंबिवली : रेल्वे प्रवास करून इच्छितस्थळी जाण्यासाठी रेल्वे मार्गावरून पायी जाणाऱ्या एका प्रवासी महिलेचा पाठलाग करत लुटारूने अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाळी आणि मोबाईल हिसकावून पोबारा केला. या घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासांतच फरार लुटारूला जेरबंद करण्यात यश मिळविले. लालबहादूर बाकेलाल यादव (२४) असे अटक केलेल्या लुटारूचे नाव असून हा डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी कॉलनी परिसरात राहणारा आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार प्रवासी संध्या नागराळ (54) या बदलापूर येथे राहतात. काही कामानिमित्त त्या दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहून डोंबिवलीत आल्या होत्या. लोकलने डोंबिवलीहून कोपर रेल्वे स्थानकात उतरून त्या पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरून पायी जात असतानाच रात्री नऊच्या सुमारास पाळत ठेवलेल्या लुटारूने अचानक संध्या यांच्यावर कैचीने वार केले. या हल्ल्यात संध्या जबर जखमी झाल्या. संधी साधून लुटारूने संध्या यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाळी आणि महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला.
डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात संध्या नागराळ यांच्या तक्रारीवरून लुटारूच्या विरोधात भादंवि कलम 395, 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला. कोपर स्थनाकानजीक गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लुटारूला तात्काळ कैची आणि मुद्देमालासह ताब्यात घेतले. या लुटारूने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केलेत का ? याचा तपास पोलीस करीत आहेत. अटक आरोपीला लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.