डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातून दुचाक्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाक्या असा सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. नीरज चौरासिया (१९, रा. सावंत पार्क, अंबरनाथ) असे दुचाकी चोराचे नाव आहे.
काटई नाक्यावर काळ्या रंगाच्या चोरीच्या दुचाकीसह एक इसम येणार असल्याची खबर गुन्हे शाखेचे हवा. विश्वास माने यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप चव्हाण, फौजदार संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. बालाजी शिंदे, हवा. विलास कडू, हवा. बापुराव जाधव, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड आणि गोरक्ष शेकडे या पथकाने काटई नाक्यावर चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नीरजच्या अटकेतून अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता वपोनिरी नरेश पवार यांनी व्यक्त केली.
सराईत रिक्षाचोर अटकेत
मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात रिक्षा चोरणारा एक इसम मलंग रोड भागात फिरत होता. ही माहिती गुन्हे शाखेचे हवा. दीपक महाजन यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, गुरूनाथ जरग, बालाजी शिंदे, विलास कडू, बापू जाधव, ज्योत्स्ना कुंभारे, मेघा जाने, दीपक महाजन, गोरक्ष रोकडे, मंगल गावीत, अनुप कामत, विश्वास माने यांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी सोहम घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्याला हटकताच तो उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळाला. पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली. सोहम दिपक इस्वलकर (२३, रा. नंदनवन, जय साल्पादेवी सोसायटी, पी. के. रोड, मुलुंड-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने टिटवाळा, कुर्ला, कांजुरमार्ग, बाजारपेठ, धारावी, विक्रोळी, कल्याण परिसरात रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या रिक्षा त्याने उल्हासनगर मधील व्हीटीसी मैदानावर आणून तेथे त्यांची विक्री करण्याचे नियोजन केले होते. त्याच्याकडून चोरीच्या सात रिक्षा जप्त केल्या आहेत.