डोंबिवली : डोंबिवलीजवळ असलेल्या खोणी गाव हद्दीत म्हाडातर्फे गृहप्रकल्प इमारत उभारणीचे काम सुरू आहे. गेल्या रविवार ते गुरूवार या कालावधीत या प्रकल्पातील पीव्हीसी पाईप जाळून त्याच्या आतील १५ लाख ३२ हजार रूपयांच्या तांब्याच्या तारांची चोरी चोरट्यांनी केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मे. बी. जी. शिर्के बांधकाम कंपनीचे व्यवस्थापक राकेश वाघ यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शिर्के कंपनीचे खोणी गाव येथे म्हाडा प्रकल्पातून घरे उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी १३ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चोरट्यांनी गेल्या रविवार ते गुरूवार या कालावधीत इमारतीच्या सर्व मजल्यांवरील विद्युत गाळ्याचे कुलूप तोडून त्यामधील पी. व्ही. सी. पाईप जाळून टाकले. या पाईपच्या आतील भागातील तांब्याची तार भंगारात विकण्यासाठी चोरून नेली. या तारेची बाजारातील किंमत १५ लाख ३२ हजार रूपये आहे, असे पोलिसांनी सांगितले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.