ठाणे, अविनाश उबाळे : कल्याण कसारा लोहमार्गावरील वासिंद जवळील वेहळोली गावाजवळ असलेल्या रेल्वेगेट खालून दुचाकी स्वार व काही नागरिक जीव धोक्यात घालून रोज रेल्वे रुळ ओलांडताना दिसत असून येथे अती वेगाने येणाऱ्या ट्रेनमुळे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता वेहळोली रेल्वे गेटवर पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा लोहमार्गावरील वासिंद जवळ असलेल्या वेहळोली गावाकडे जाताना रेल्वे रुळ ओलांडून वेहळोली गावाकडे जावे लागते. येथे रेल्वे प्रशासनाचे रेल्वे गेट आहे. एखादी लोकल अथवा एक्सप्रेस येत असताना सुरक्षेसाठी हा गेट बंद केला जातो. मात्र काही दुचाकीस्वार रेल्वे गेट खुला होण्याची वाट न पाहता अतीघाई करीत अक्षरशःजीव धोक्यात घालून गेटखालून दुचाकी नेऊन धोकादायक रूळ ओलांडत आहेत. हा भयानक जीवघेणा खेळ वेहळोली रेल्वे फाटक या ठिकाणी रोज पाहायला मिळतो आहे.
रेल्वगेटवरील रेल्वे कर्मचारी रुळ ओलांडू नका असे दुचाकीस्वार व येथील नागरिकांना सांगतात. मात्र गेटवरील या कर्मचाऱ्यांचे न ऐकता रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार बिनधास्तपणे सुरुच आहेत. रेल्वे गेटखालून दुचाकी नेताना किंवा रेल्वे रुळ ओलांडून जाताना त्याच वेळेस अतिवेगाने येणाऱ्या मालगाडी ,एक्सप्रेस ,लोकलखाली सापडून मोठा अपघात होण्याची भिती येथे व्यक्त होत आहे. रेल्वे रुळ ओलांडल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून जागरूकतेसाठी जाहिराती अथवा कडक कारवाई म्हणून दंड ठेाठावत असले तरी सुध्दा रुळ ओलांडून जाणा-यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.