मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे ९६२ ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात १२०० मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या २५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. १२०० मीटर लांबीमध्ये ७ मीटर रुंदीचे काँक्रिटीकरणाचे काम मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!