मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या सभा, बैठकांचे फोटो व चित्रिकरणासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालया करिता अत्याधुनिक १० छायाचित्र आणि १० व्हिडीओ कॅमेरे खरेदीचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यानुसार सुमारे दोन कोटी १५ लाख रुपयांचे खर्चाला मंजूरी दिली असून या संदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केले.
राज्य सरकारच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वय करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचानालयाची ओळख आहे. सरकारचे विविध कल्याणकारी उपक्रम, कार्यक्रम, धोरणे आणि विविध मोहिमांची माहिती या यंत्रणेद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. परंतु, महासंचालनालयाकडे असलेले फोटो व व्हिडीओ कॅमेरे कालबाह्य झाले आहेत. तर काही नादुरुस्त आहेत. परिणामी योग्य प्रकारे चित्रीकरण करता येत नाही. सध्या सोशल माध्यमाच्या जमाना असून हायटेक यंत्रणा दैनंदिन कामांसाठी वापरणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार माहिती व जनसंपर्क संचालनालयाला दहा अत्याधुनिक छायाचित्र आणि व्हिडीओ कॅमेरे खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही यंत्रसामुग्री खरेदीसाठी सुमारे २ कोटी १५ लाख ७२ हजार २४८ रुपये येणार असून या खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय व वित्तीय विभागाने मंजूरी दिली आहे.
खरेदी प्रक्रियेसाठी अटी – शर्ती
छायाचित्र, व्हिडीओ कॅमेरे खरेदीसाठी ई- मार्केट प्लेस या पोर्टलचा वापर करावा. संबंधित कॅमेरे मार्केट प्लेस पोर्टलवर उपलब्ध न झाल्यास ई टेंडर काढून खुल्या पद्धतीने खरेदी करावेत. सरकारने घातलेल्या अटी शर्तींचे पालन करावे. तसेच २०२३ -२४ च्या आर्थिक वर्षातील भांडवलमधून खरेदी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.