लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाचा कानाडोळा
ठाणे/ अविनाश उबाळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या शहापूर जवळील माहुली गडाची तटबंदी आता ढासळत चालली आहे. डागडुजी अभावी गडाची प्रचंड दुरावस्था व पडझड झाल्याचे वास्तव समोर येत आहे. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक माहुली गडाचे अवशेष नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधीसह पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ऐतिहासिक माहुली गडाची वेळीच डागडुजी होऊ शकलेली नाही. तथापि ऐतिहासिक पुरातन किल्ल्याची वेळीच देखभाल आणि सुरक्षितता न ठेवल्याने या ऐतिहासिक गडाच्या इतिहासकालीन अवशेष दुरुस्ती व डागडुजी अभावी अखेरच्या घटका मोजत असून हा इतिहास नष्ट होण्याची भीती आता इतिहास तज्ञांकडून व्यक्त होत आहे. माहुली गडाची ही दुरवस्था पाहता आता वेळीच गडाची पुरातत्व विभागाकडून डागडुजी होणं गरजेचं आहे अशी मागणी शिवप्रेमी व इतिहास प्रेमी करीत आहेत.
सहयाद्री पर्वतरांगा कडाकपारीत हिरव्यागार वृक्षांच्या दाट वनराईत उंच असा दिसतो तो माहुली गड या किल्ल्याचा इतिहास पाहता शहाजीराजांनी आदिलशाही विरुध्द जेव्हा युध्द पुकारले होते तेव्हा जिजाबाई व शिवबांना या किल्ल्यावर वास्तव्यासाठी शहाजीराजांनी आणले होते.पुढे पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे २३ किल्ले मोघलांना दिले होते त्यात माहुली गडाचा समावेश होता.पळसगड व भंडारगड यांना अगदी खेटून असलेला व सहयाद्रीच्या कुशीत असलेला हा बलशाली असा माहुली किल्ला आहे. किल्ला बघितल्यानंतर महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो.चढण्यासाठी अत्यंत अवघड असणारा हा माहुली गड आजही दिमाखात उभा आहे.मात्र देखभाल व दुरुस्ती अभावी दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या काळातील या ऐतिहासिक ठेवा असलेल्या व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या अभेद्य अशा गडाची तटबंदी आता सर्वत्र ढासळत चालली असून, गडाच्या वास्तूंची प्रचंड पडझड झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
गडाच्या महादरवाज्याची मुख्य कमान तुटून पडली आहे. येथील कल्याण दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, यांची प्रचंड दुरवस्था झालेली दिसते. मुघलांच्या काळातील नमाजगिराचे अवशेष दिसतात त्यांची देखील दुरवस्था झाल्याचे नजरेस पडते तर गडाच्या दगडी भिंती पण ढासळलेल्या आहेत. महादरवाज्याची दगडी पायऱ्यांची देखील तुटफुट होऊन फारच दुरवस्था झाली आहे. महादरवाज्याचा रस्ता पडझडीमुळे बंद झालेला दिसतो आहे. येथील अनेक पाऱ्या पावसाच्या पाण्यात वाहुन गेल्याचे दिसते. गडावरील चार गुहांची पण पडझड झालेली आहे.
पुरातन शिलालेख दगडी शिल्पाकृती लेण्यांचे छिन्नविच्छिन्न अवशेष हे भग्नावस्थेत स्थितीत इतरत्र पडून आहेत.येथील ऐतिहासिक पाण्याच्या तलावाची व तेथील एका टाक्याची गाळ साठल्यामुळे प्रचंड दैनवस्था झाली आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने ऊन,वारा,पाऊस आणि पुराच्या संकटामुळे या पुरातन गडाची पडझड होऊन आता दुर्दशा झाली आहे.माहुली गडाचे ऐतिहासिक अवशेष काही ठिकाणी मातीत गाडले गेलेले दिसत आहेत.एकंदरीतच गडाची प्रचंड अशी दुर्दशा झाल्याचे हे भयानक असे चित्र माहुली गडाला भेट दिल्यास पाहण्यास मिळते आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने याकडं तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.