लॉरेन्स विष्णोईच्या नावे धमकीचा ई-मेल
छत्तरपूर, 09 डिसेंबर : मध्यप्रदेशच्या छत्तरपूर येथील बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ई-मेलच्या माध्यमातून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी बिहारहून एका आरोपीला अटक केलीय.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धीरेंद्र शास्त्रींना 19 ऑक्टोबर 2023 पासून खंडणीचे दोन-तीन मेल पाठवले होते. आरोपींनी एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याचबरोबर पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आरोपींनी हा ईमेल लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पाठवला होता. यामध्ये धीरेंद्र शास्त्री यांना एक दिवसाची मुदत देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. धीरेंद्र शास्त्री यांनी 20 ऑक्टोबर रोजी धमक्या देणार्या ईमेलची माहिती बमिठा पोलिस ठाण्यात दिली होती. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर सायबर सेलच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले. या आरोपीला आज, शनिवारी राजनगर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केलीय.