मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना मार्चपासून पेन्शन
मुंबई : ६५ वर्षांच्या वरील सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मार्च २०१८ पासून दरमहा रु. १२००/- पेन्शन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आज केलीय. पेन्शन वाटपाचा कार्यक्रम मार्च महिन्यात होणार असून त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.
अल्प पगारावर पत्रकारिता करून निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ पत्रकार आजही पेन्शनपासून वंचित आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जडणारे आजार आणि औषधोपचारांसाठी येणारा खर्च यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार हवालदिल झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ६५ वर्षांवरील सर्व सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मार्चपासून पेन्शन देण्यात येईल, असे वाबळे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भविष्यात पेन्शनच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे निधीसंकलन करण्यात येईल, असेही वाबळे यांनी पत्रकात म्हटलय. मुंबई मराठी पत्रकार संघांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्रच कौतूक होत आहे.