मुंबई : ‘लेके पहला पहला प्यार, भरके आंखो में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर’ यासारख्या हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांमधून आपल्याला दिसणारा ‘वरळी सी फेस’ आता लवकरच एक नवीन रुपडे घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे रुपडे आता पूर्वीपेक्षा अधिक देखणे, अधिक सुविधापूर्ण आणि अधिक पर्यावरण पूरक असणार आहे. या सगळ्यांसाठी निमित्त ठरणार आहे, तो वेगाने आकारास येत असलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘सागरी किनारा रस्ता’ !.
‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या ‘सागरी किनारा रस्त्याचे (कोस्टल रोड) बांधकाम सातत्याने वेगात सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या ‘कोस्टल रोड’चे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम आतापर्यंत झाले आहे. ‘कोस्टल रोड’ची कामे निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू असून पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर २०२३ पर्यंत पर्यंत हा सागरी किनारा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा आहे.
मात्र, मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणारा हा भव्य-दिव्य ‘कोस्टल रोड’ एकटा येणार नसून आपल्या सोबत मुंबईकरांसाठी अनेक नवनवीन आकर्षणं आणि सुविधा देखील घेऊन येणार आहे. या अभिनव आकर्षणांमध्ये असणार आहेत समुद्रावरुन येणाऱ्या हवेवर डोलणारी उद्याने ! सागरी लाटांच्या साथ-संगतीने वेगवेगळ्या कला सादर करता येतील अशी खुली नाट्यगृहे ! आणि याच सागरी किनारा रस्त्यालगत आकारास येणार आहे मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ (Promenade) ! तब्बल २० मीटर रुंद व ८.५ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे.
मुंबईतील सर्वात मोठ्या पदपथाबाबत आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना समर्पित असलेल्या ‘प्रियदर्शनी पार्क’ येथून सुरू होणारा हा पदपथ माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतींना समर्पित असलेल्या ‘राजीव गांधी सागरी सेतू’ पर्यंत म्हणजेच ‘वरळी-वांद्रे सी लिंक’ पर्यंत असणार आहे.
मुंबईतील सर्वात मोठ्या समुद्री पदपथाची ही आहेत वैशिष्ट्ये
· श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या (वरळी वांद्रे सी-लिंक) वरळी बाजूपर्यंत १०.५८ किमी लांबीच्या सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम सध्या वेगात सुरु आहे.
· ३.४५ किमी लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ हा बोगद्यातून जाणारा असणार असून सदर बोगदा श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान असणार आहे.
· प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत नवीन विस्तीर्ण समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे.
· प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ८•५ किमी लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी ही २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे.
· सध्या नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राईव्ह) असणारा ‘समुद्री पदपथ’ हा मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ असून त्याची लांबी सुमारे ३.५ किमी एवढी आहे. तथापि, ‘कोस्टल रोड’ लगत आकारास येणारा ‘समुद्री पदपथ’ हा जवळपास दुपटीपेक्षा अधिक लांबीचा म्हणजेच ८.५ किमी लांबीचा असल्याने तो मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ ठरणार आहे.
· वरीलनुसार वरळी वांद्रे सी-लिंकच्या वरळी बाजूपासून प्रियदर्शनी पार्क दरम्यानअसणा-या समुद्री पदपथाची एकूण लांबी ही ८.५ किमी एवढी असणार आहे.
· या पदपथालगत व पदपथांतर्गत सुशोभिकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे.
· सध्या नेताजी सुभाष मार्गालगत असणारा समुद्री पदपथ हा सुमारे ३.५ किमी लांबीचा आहे. ही बाब लक्षात घेतल्यास भविष्यात कोस्टल रोडलगत आकारास येणारा हा समुद्री पदपथ मुंबईतील सर्वात मोठा पदपथ ठरणार आहे.
· सागरी किनारा रस्त्यासाठी ११९ लाख ४७ हजार ९४० चौरस फुटांचे (१११ हेक्टर) भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २३.८८ टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार ४४० चौरस फुटांच्या परिसरावर (२६.५० हेक्टर) सागरी किनारा आंतरबदलासह रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे १३.६ टक्के क्षेत्र म्हणजेच १५,६०,७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) क्षेत्र हे समुद्र भिंतीच्या बांधकामासाठी यामुळे समुद्री लाटा पासून संरक्षण होईल. उर्वरित ६३•६ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. ‘समुद्री पदपथ’ देखील याच सुविधांचा भाग असणार आहे. या व्यतिरिक्त या जागेमध्ये १ हजार ८६४ एवढी वाहनक्षमता असणारे ३ भूमीगत वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
· सोबतच ‘कोस्टल रोड’ लगत ‘फुलपाखरू उद्यान’ आणि ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्यात येणार आहे.
· सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधन गृहे इत्यादी बाबीही ‘कोस्टल रोड’ सोबत विकसीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे.