डोंबिवली : मालकाचा विश्वास संपादन करून त्याच्याच घरातील मालाची साथीदारांच्या साह्याने चोरी करणाऱ्या तिघांना डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यातील मुख्य चोरटा अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी या टोळीतील त्रिकुटाकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 96 हजार 567 रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
लीलबहादूर लालबहादूर कामी (45, चायनीज हॉटेलातील हेल्पर, रा. जयराम म्हात्रे यांचा सद्गुरू कृपा बंगला, सेक्टर 10, कामोटे, नवी मुंबई), टेकबहादूर जगबहादूर शाही (40) आणि मनबहादूर रनबहादूर शाही (45, व्यवसाय – हेल्पर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नेपाळ देशातील रहिवासी आहेत. यातील लीलबहादूर कामी याला नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या. तर टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही या दोघांच्या कर्नाटक राज्यातील बँगलोरमधून मुसक्या आवळल्या आहेत.
पश्चिम डोंबिवलीतील राजू नगर परिसरात असलेल्या धनश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे (31) यांच्या तक्रारीतून शनिवारी 27 जुलै रोजी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार कुंदन म्हात्रे यांच्याकडे सागर विर्श्वकर्मा उर्फ थापा (मूळ रा. नेपाळ) नामक नोकर कामाला होता. हा नोकर त्यांच्याकडे दीड वर्षांपासून घरकामास होता. सागर याने बिल्डींगचे मेनगेट तोडले. त्यानंतर बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, 10 विवीध कंपन्यांची घड्याळे, भारतीय चलनातील रोख रक्क्म, डॉलर व युरो असा 15 लाख 52 हजार 807 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना दिल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि गहिनीनाथ गमे, सपोनि सचिन लोखंडे, उपनि दिपविजय भवर, उपनि अमोल आंधळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून शोध सुरू केला. या पथकाने लीलबहादूर कामी, टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही यांच्याकडून चोरलेल्या ऐवजापैकी 159 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, 230 ग्रॅम चांदीच्या वस्तू, विवीध कंपन्यांची 8 घड्याळे, भारतीय व परकीय चलनाच्या नोटा व नाणी असा एकूण 6 लाख 96 हजार 567 रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला. मात्र या तिघांच्या मदतीने गॅस एजन्सीचे मालक कुंदन म्हात्रे सागर विर्श्वकर्मा उर्फ थापा अद्याप हाती लागला नाही.