डोंबिवली, १३ डिसेंबर : डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत सातत्य असल्याने फेरीवाले पुरते वैतागले आहेत. गेली नऊ वर्ष फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी का झाली नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालिकेला याचा जाब विचारण्यासाठी येत्या मंगळवारी १९ तारखेला १० वाजता डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात फेरीवाल्यांचा मोर्चा निघणार आहे.
कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे म्हणाले, २०१४ पासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही. फेरीवाल्यांची नोंदणी होऊनही, फेरीवाल्यांचा शासनाच्या नियमानुसार कर्ज उपलब्ध करूनही फेरीवाल्यांना हक्काची बसण्यास जागा नाही. स्टेशन बाहेरील १५० मीटर परिसरात फेरीवाले बसले तर पालिकेडून कारवाई होते. दुसरीकडे नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास ठरलेले धोरण फक्त कागदावरच आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी लवकरच टाऊन वेडिंग कमिटी निर्णय घेईल असे अनेक वेळा आश्वसीत करण्यात आले. यावरून अनेक वेळा फेरीवाल्यांनी मोर्चे काढले असून त्यांना बसण्यास हक्काची जागा मिळाली नाही. स्टेशन बाहेरील १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असूनही फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले. पालिकेच्या करवाईला न जुमानता दिवाळी सणात फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी होईना आणि स्टेशन परिसरात बसू देईना अशी अवस्था फेरीवाल्यांची झाली आहे.
मात्र फेरीवाले रस्ता अडवून, फुटपाथ अडवून, मिळेल त्या जागेत बसत असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. मनसेने स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा आम्ही मोकळा करू असा इशारा दिल्यावर पालिकेची जोरदार कारवाई सुरू झाली होती.