मुंबई– मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर येत्या १५ दिवसांत प्रस्ताव सादर करा, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. मंत्री मुनगंटीवार यांच्या या निर्देशामुळे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरांच्या मागणीला यश आले आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अधिवेशनादरम्यान लक्षवेधीद्वारे केली होती. त्यानुसार आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यास त्याचा मच्छिमारांना मोठा फायदा होणार असून याबाबत येत्या १५ दिवसांत राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी मत्स्यव्यवसाय विभागाला दिले. सदर प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास शेती व्यवसायाला जे फायदे होतात व शेतकऱ्यांना जे लाभ, सवलती मिळतात त्या लागू होऊ शकतील. याप्रसंगी आमदार प्रविण दरेकर यांच्यासह मत्स्यविभागाचे आयुक्त, अधिकारी वर्ग उपस्थित होते.