ठाणे / अविनाश उबाळे : गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रसह ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने तातडीने पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड,भिवंडी, कल्याण या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात येत असून अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.योग्य प्रमाणात पाऊस न झाल्याने या आधीच भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता, त्यानंतर आता रब्बी हंगामातील पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याच्यावर ओढवलेले संकट हे भयानक आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन पुन्हा उभे करणे गरजेचे असून सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दयानंद चोरघे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी केली आहे.