ठाणे : नवीन कळवा पुलाच्या ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका उद्यापासून (30 नोव्हेंबर 2022) वाहतुकीसाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. नवीन कळवा पुलाची ही चौथी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

कळवा खाडीवरील नवीन पुलाच्या पोलीस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका यांचा लोकार्पण सोहळा 13 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी मुख्यमंत्रयांनी ठाणे कारागृहाजवळील मार्गिका 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणेच सदर मार्गिका एक दिवस पूर्वीच म्हणजेच दिनांक 30 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

ठाणे कारागृहाच्या बाजूकडील ही मार्गिका कळवा चौक आणि बेलापूर मार्गावर उतरणार आहे. ही मार्गिका वाहनांसाठी सुरू झाल्यावर ठाणे बाजूकडील चौकामध्ये तसेच कळवा येथील शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

साकेतकडील मार्गिकेचे कामही युद्ध पातळीवर
या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार असून वेळेची बचत होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली केल्यानंतर कळवा चौक परिसर, ठाण्याहून बेलापूर, नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच साकेतकडील मार्गिकेचे कामही युद्ध पातळीवर सुरू असून ही मार्गिका दिनांक 31 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात येणार आहे असेही महापालिका आयुक्त बांगर यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!